Wednesday, 1 April 2020

मंठा तालुक्यात कोरोनाचा संशयित रुग्ण सापडला.

नागरिकांनी सावधगिरी पाळावी, घराबाहेर पडणे टाळावे.

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनीधी: कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून देशात शासकीय यंत्रणा तसेच आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. देशात संचारबंदी लागू झाली आहे. परंतु संचारबंदी असताना देखील नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक नागरिक दवाखाना, औषधी, जीवनावश्यक वस्तू खरेदी आदी कारणे सांगून रस्त्यावर सर्रास फिरताना दिसत आहेत. नागरिकांनो सावध व्हा कोरोना आपल्या घराच्या दारापर्यंत पोहोचला आहे.
कोरोना विषाणूच्या धास्तीने कोणत्याही खेड्यात बाहेरून आलेल्या जवळच्या नातेवाईकांना देखील प्रवेशबंदी केली आहे. मुंबई-पुण्याहून व इतर शहरातून आलेल्याना शेतात दुरून थांबावे लागत आहे. याचे उदाहरण म्हणजे रोहिणा ता. परतूर येथे गुरुवारी ( ता. 19 ) पुण्याहून आलेल्या एका नातेवाईकास गावकऱ्यांनी गावात प्रवेश देण्यास नाकारले. त्यामुळे तो मंठ्या शहरास लागून असलेल्या वांजोळा पुनर्वसन येथे मुक्कामी आला. त्यास सर्दी-खोकला-ताप असल्याने मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर औषध उपचार केले. परंतु त्यात सुधारणा न झाल्याने त्यास मंगळवारी ( ता.  31 ) पुढील उपचाराकरिता जालना येथे पाठवीत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी दीपक लोणे व वैद्यकीय अधीक्षक प्रताप चाटसे यांनी दिली आहे. तसेच तो ज्या घरात मुक्कामी राहिला त्या घरातील सर्वांची वैद्यकीय अधिकारी पथक तपासणी करण्यासाठी येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment